शिस्त, परिश्रम, आणि दृढ निश्चयातून डॉ. संजीव बगई झाले विशिष्ट आणि विवेकी डॉक्टर!

डॉ संजीव बगई यांचा स्वभाव आणि वृत्ती दोन्ही कठोर वाटतात, मात्र मनातून ते लहान मुलासारखे निर्मळ आणि मुलायम असतात. . . . लहान मुलांच्या समस्या दूर करताना एक अनोखी कहाणी लिहिली आहे, लहानग्यांच्या या मोठ्ठ्या डॉक्टरानी. . . . लहानग्या मुलांच्या त्रासाला त्यांच्या माता-पितांपेक्षा चांगले समजू शकतात डॉ संजीव बगई.

शिस्त, परिश्रम, आणि दृढ निश्चयातून डॉ. संजीव बगई झाले विशिष्ट आणि विवेकी डॉक्टर!

Wednesday March 01, 2017,

12 min Read

ही घटना नव्वदच्या दशकातील आहे, सहा वर्षाच्या मुलाला त्याचे आई-वडिल उपचारांसाठी रुग्णालयात घेवून गेले. मुलाची स्थिती वाईट होती. पोलिओने त्याला संपूर्णपणे घेरले होते, स्थिती इतकी नाजूक होती की आई - वडिलांनी त्या मुलाच्या जिवंत राहण्याची आशा सोडून दिली होती. त्यांना वाटत होते की काही चमत्कार झाला तरच त्यांचे मूल वाचणार होते, आणि हा चमत्कार कुणातरी चांगल्या डॉक्टरांच्या हातानेच होवू शकत होता. एका डॉक्टराने ही जबाबदारी घेतली. त्या तरूण डॉक्टरने प्रथम मुलाची कसून तपासणी केली आणि त्याची नाजूक स्थिती पाहून त्याला त्वरीत रुग्णालयात भर्ती करून घेतले. रक्ताची तपासणी आणि इतर तपासणीत समजले की, बिलीरुबीन ५५ पेक्षा पुढे गेले होते, सामन्यत: जे पाच असायला हवे होते, बिलीरूबीन गरजेपेक्षा जास्त झाल्याने त्या मुलाची त्वचा, डोळे आणि चेह-याचा रंग पिवळा झाला होता. काविळही साधारण नव्हती, त्याचे रूप भयानक होते. रूग्णालयात भर्ती केल्यानंतर देखील त्याच्या प्रकृतीमध्ये काहीच फरक पडत नव्हता. मुलाची स्थिती इतकी भयंकर होती की, त्याच्या मूत्रपिंडाचे काम बंद झाले होते, काही दिवसांनी त्याच्या फुफ्फूसांनी आणि ह्रदयानेही काम बंद केले. एकदा तर डॉक्टरांना वाटले की त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याचे यकृत बदलावे लागेल, मात्र त्याची स्थिती इतकी नाजूक होती की, ते शक्य नव्हते. ज्यावेळी ही गोष्ट मुलांच्या आई वडिलांना समजली त्यावेळी त्यांना मुलगा वाचणार की नाही अशी खात्री झाली. मात्र मुलाच्या डॉक्टरांनी या स्थितीमध्येही आशा सोडली नाही, त्यांनी पूर्वी देखील अशाप्रकारच्या रुग्णांवर इलाज केला होता. अनेक किचकट प्रकरणात यश मिळवले होते. वाईट स्थितीत आणलेल्या कितीतरी मुलांना त्यांनी उपचार करून निरोगी आणि तंदूरुस्त केले होते. मात्र यावेळी स्थिती वेगळी होती. ती कठीण होत जात होती. ती स्थिती पाहून अन्य डॉक्टरांना कापरे भरले असते. मात्र त्या सहा वर्षांच्या मुलाला वाचविण्यासाठी या डॉक्टरने आपले सारे कौशल्य पणाला लावले होते. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला यश येवू लागले. मुलाच्या शरीराचा पिवळा रंग हळू हळू कमी होत गेला. त्याला किमान महिनाभर लागला. त्यामुळे मुलगा किमान दीड महिना रुग्णालयातच राहिला. आणि उपचाराने पुन्हा एकदा स्वस्थ झाला. जणू काही त्या डॉक्टरांनी त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. मुलगा वाचल्याने त्याच्या पालकांच्या चेह-यावर हास्य परतले होते, त्यांच्या मनात उत्साह आणि विश्वास वाढला होता. याच मुलाचे त्यानंतर दहावीच्या आणि बारावीच्या परिक्षेत चांगले गुण मिळाल्याने अव्वल क्रमांक आले, तो अभियंता झाला आणि त्याचे लग्न देखील झाले. या लग्नात त्याने डॉक्टरांनाही आंमत्रित केले, आणि जो मुलगा मृत्य़ूपंथाला होता त्याला नवरदेव म्हणून पाहण्याचा आनंद ते घेत होते. त्या डॉक्टरांचे नाव आहे डॉ संजीव बगई! ते डॉ बगई ज्यांना त्यांच्या बालरोग क्षेत्रात असाधारण कार्य केल्याबद्दल भारत सरकारने पद्मश्रीने सन्मानित केले आहे. त्यांच्या नवजात अर्भके आणि लहानग्यांच्या उपचार क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना डॉ बि सी रॉय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले, हा या क्षेत्रातील मोठा पुरस्कार समजला जातो.


image


लहान मुलांच्या उपचारांच्या क्षेत्रात डॉ बगई यांनी आतापर्यत हजारो मुलांवर उपचार केले आहेत, एका विशेष मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, “प्रत्येक डॉक्टरच्या जीवनात असे कसोटीचे असाधारण क्षण येत असतात, ज्यातून त्याना बरेच काही नवे शिकायला मिळते, काविळ झालेल्या त्या सहा वर्षांच्या मुलाचा इलाज करताना मला बरेच काही नवे शिकायला मिळाले त्यात आव्हान होते, मी ते स्विकारले आणि यश मिळवलेच”

डॉ बगई यांनी सहकारी डॉक्टरांच्या मदतीने नंतर एक शस्त्रक्रिया केली ज्याची खूप चर्चा झाली. ही शस्त्रक्रिया होती जुळ्या बहिणीना वेगळे करण्याची, सीता आणि गिता या दोन बहिणी जुळ्या जन्मल्या होत्या, त्यांना वेगळे करणे अत्यंत कठीण काम होते. हे काम कुणा एका डॉक्टर किंवा सर्जनच्या हाती नव्हते, त्यात मोठी जोखीम होती, मुलींच्या जीवाला धोका होता. मात्र हा धोका डॉ बगई यांनी पत्करला आणि यश संपादन करून जगात नाव मिळवले. सर्वात महत्वाचे म्हणजे अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया त्यापूर्वी जगभरात केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच झाल्या होत्या, ज्यात शरीर वेगळे करण्यात आले होते. भारतात तर अशाप्रकारे केवळ एखाद दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या.

सीता आणि गीता यांचे प्रकरण देखील खूपच गुंतागुंतीचे होते, जगात अशा फारच थोड्या घटना होत्या, अशा प्रकरणात नेहमीच शस्त्रक्रिया करण्यापर्यंत वेळ येतच नाही. किंवा तेथे पोहोचले तरी सर्वच प्रकरणात यश येतेच असेही नाही. जुळ्यांना वेगळे करणे खूप कठीण शस्त्रक्रिया असते, वेगवेगळ्या व तज्ञ डॉक्टरांचा समन्वय करून ते करावे लागते. सीता आणि गीता यांचा जन्म बिहारच्या गरीब घरात झाला होता, जन्मत: त्या जुळ्या होत्या. त्यांची डोकी, हात पाय वेगळी होती, मात्र कमरेखाली त्या जुळल्या होत्या, त्यांचे मलमूत्र एकाच अंगातून येत असे, म्हणजे त्यांच्या किडन्या आणि गुप्तांग पाठीचा कणा एकच होते, त्यांना वेगळे करण्यासाठी त्यांच्या पालकांनी अनेक प्रयत्न केले, मात्र कुणीही डॉक्टरांनी हे प्रकरण हातात घेण्यास होकार दिला नाही. त्यामुळे पालकांनी आशा सोडल्यात जमा होती. त्या दोन्ही मुलींचे हाल पहाताना त्यांना यातना होत होत्या, त्यांना लवकरात लवकर वेगळे केले नाही तर त्या मरणार हे नक्की होते.


image


ज्यावेळी दिल्लीत डॉ बगई यांना हे समजले, त्यांनी हे प्रकरण हाताळावे असे ठरविले. ते सोपे नव्हते. एकट्याने करण्याचे हे काम नव्हते. त्यानी सहकारी तज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनंतर ठरविण्यात आले की, बत्रा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात येईल. डॉ बगई यांच्या प्रयत्नातून २७ डॉक्टराचा चमू तयार करण्यात आला. त्यात सगळ्या महत्वाच्या क्षेत्रातील डॉक्टरांचा समावेश होता. सीता आणि गीता यांच्या पालकांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, त्यामुळे डॉ बगई यांनीच सा-या सहकारी डॉक्टरांना विना मोबदला काम करण्यास राजी केले होते. निश्चित केलेल्या दिवशी सा-या डॉक्टरांच्या चमूने १२ तासापर्यंत ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया दीड वर्षांच्या त्या लहानग्या बहिणींवर पार पाडली, त्यांच्या या मेहनतीचा परिणाम चांगला झाला. ज्यावेळी या जुळ्या बहिणींना रूग्णालयात आणले होते तेंव्हा त्यांच्या बाहेरच्या शरीरासोबतच त्यांच्या आतले अवयव देखील जुळले होते. त्यांना वेगळे करण्यासाठी दोन वेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पहिल्या वेळी त्यांचे शरीर वेगळे केले, त्यांनतर त्याच्या शरीरात नवे अवयव देण्यासाठी ‘रिकन्स्ट्रक्टिव’ करण्यात आली. त्यासाठी या चमूने आपले ज्ञान, प्रतिभा आणि मेहनत सारे झोकून दिले होते. हे काही साधारण यश नव्हते, ज्यातून भारतीय डॉक्टरांना जगात मान सन्मान मिळणार होता. जगभरात अशा जुळ्या मुलांच्या पालकांच्यासाठी तो नवा आशेचा किरण होता. त्यामुळेच अनेकांना हा चमत्कार वाटला होता, मात्र यामध्ये काही संशय नाही की, सीता आणि गीता यांना डॉ संजीव बगई यांच्या प्रयत्नांमुळेच नवे जीवन मिळाले होते. ज्यावेळी आता ते त्या श स्त्रक्रियेबाबत आठवण काढतात त्यावेळी त्यांच्या चेह-यावर समाधान आणि अभिमान स्पष्टपणे जाणवते, त्यांच्या यशस्वी जीवनात तो एक महत्वाचा टप्पा ठरला आहे. जीवनातील सर्वात मोठे यश म्हणून ते या शस्त्रक्रियेचा उल्लेख करतात. त्यांच्यामते छोट्या वयातच ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील दी प्रिंन्स ऑफ वेल्स चिल्ड्रेन्स हॉस्पिटलने त्यांना फेलो म्हणून नावाजणे ही त्यांच्यासाठी महत्वाची कामगिरी होती. १९९१-९२ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला होता त्यावेळी त्यांचे वय केवळ २६ इतकेच होते. साधारणपणे सिडनीच्या या रूग्णालयात नामचिन डॉक्टरांनाच हा सन्मान मिळाला आहे. तेथे त्यांनतर त्यांना अनेक जगद्विख्यात डॉक्टरांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. या रूग्णालयात त्यांना नवे बरेच काही शिकायलाही मिळाले होते, सिडनीमध्ये त्यांना जो अनूभव मिळाला त्याचा फायदा आजही होतो असे ते सांगतात. डॉ बगई म्हणतात की, “ जो डॉक्टर सिडनीच्या प्रिन्स ऑफ वेल्स रूग्णालयात काम करू शकतो तो जगातील कोणत्याही रूग्णालयात काम करू शकतो.


image


संजीव बगई यांच्या डॉक्टर होण्याची कहाणी देखील अनोखी आहे. त्यांच्या खास मुलाखती दरम्यान त्यांनी आम्हाला सांगितले की, नोकरी करणा-या मध्यमवर्गिय घरात जन्मल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरच व्हावे म्हणून काही कुणाचा दबाव नव्हता. त्याचे वडील हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये काम करत होते तर त्यांच्या सरकारी नोकरीमुळे सारख्या बदल्या होत असत. त्यामुळे संजीव यांना लहानपणी पुणे, लखनौ, चंदीगढ, कोलकाता, मुंबई, अशा शहरातून रहायची संधी मिळाली होती. शहरी वातावरणात राहिल्याने त्यांचे मन अभ्यासात लागले आणि त्यात ते प्रविण झाले. कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी गणित, भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र या शिवाय जीवशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. जेणे करून अभियंता किंवा डॉक्टर दोन्ही होता यावे. तेथे चांगले गुण घेवून उत्तिर्ण झाल्यानंतर त्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंग दोन्ही शाखांना प्रवेश मिळत होता. मात्र त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला होता. तो त्यांचा स्वत:चा निर्णय होता. ते म्हणाले की, “ अकरावीमध्ये असताना हा विचार स्वत:च मला आला. त्यावेळी करिअर मार्गदर्शन असा काही विषय नव्हताच किंवा असेल तर मला त्याबाबत माहिती नव्हतीच. माझ्या जवळ दोन पर्याय होते. डॉक्टर किंवा अभियंता दोन्हीपैकी एक होण्याचा मी डॉक्टर होण्याचे ठरविले आणि मागे वळून पाहिले नाही.” त्यांनी मुंबईच्या जीएस वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. ज्याची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात १९२६मध्ये झाली होती. या महाविद्यालयात स्थापनेपासून आजही प्रवेश मिळवणे हे प्रतिष्ठा आणि सन्मानाचे समजले जात होते. एम बी बीएस च्या आपल्या अभ्यासाच्या वेळच्या आठवणी सांगताना ते म्हणतात, “ ती साडेपाच वर्ष मजेदार होती. ते सारे सुंदर दिवस वैद्यकीय महाविद्यालयात घालविले. त्याकाळात तीनच गोष्टी केल्या लिखाण, वाचन आणि क्रिकेट. या शिवाय चांगले खाने आणि तब्येत बनविणे. याचा आजही आनंद होतो की या गोष्टी मनमुराद केल्या. अभ्यासात कोणताच हलगर्जीपणा केला नाही, त्यामुळे काही करायचे राहून गेले असे वाटले नाही. महाविद्यालयात मी सर्वाचा आवडता होतो आणि सारे मला आवडत असत. मला क्रिकेटचा छंद होता आणि मी व्यावसायिक क्रिकेट खेळत असे. एकाबाजूला अभ्यासही होताच, दोन्ही करण्यासाठी आरोग्यपूर्ण राहणे गरजेचे होते. मी नेहमी चांगले जेवण घेत असे, खूप छान ते दिवस होते”.

डॉ बगई यांना सुरूवातीपासूनच लहान मुले आवडत असत. खास करून नव्याने जन्मलेल्या मुलांबाबत त्यांना खूपच प्रेम वाटे. त्या मुक्या बाळांच्या दु:खाला समजून घेताना की त्यांना नक्की कुठे आणि काय त्रास होतो आहे हे समजून घेणे त्यांना आव्हान वाटे. हे आव्हानच आपल्या जीवनाचा भाग असावे असे वाटल्याने त्यांनी त्यामुळे डॉक्टरीच्या शिक्षणाच्या काळात लहान मुलांच्या विभागात ते जास्तवेळ रमत असत. लहानग्यांना हातात घेवून तपासणे त्यांचे निरिक्षण करत राहाणे, शिवाय त्यांचे आजार किंवा त्यांच्या वागण्याची मूक भाषा समजून घेणे यात त्यांना रूची निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी लहान मुलांचा डॉक्टर बनण्याचे ठरविले. आपल्या एमडीच्या अभ्यासात त्यांनी बालरोग हा मुख्य विषय म्हणून घेतला त्यावेळी तेथील बालरोग निवारण विभागाच्या प्रमुखांच्या सांगण्यावरून त्यांनी पिडियाट्रीक नेफ्रोलॉजी हा विषय निवडला. म्हणजे ते लहान मुलांचे डॉक्टर झाले त्याच वेळी ते त्यांच्या किडनी आणि गुप्तांगाचे विशेषज्ञ देखील झाले होते. डॉ बगई म्हणाले की, “ मुंबईत एमडीच्या अभ्यासात असे अनेक रुग्ण येत असत की, जेथे मुलांच्या किडनीत दोष निर्माण होत असे, अशा रुग्णांनी रूग्णालय भरून जात असे. आम्ही दिवसरात्र मेहनत करत असू आमच्या विभागाचे प्रमुख पेडियाट्रीक नेफ्रलॉजिस्ट होते त्यांच्या प्रभावात मी देखील हे काम करू लागलो”

डॉ बगई गेली अनेक वर्ष मुलांचा इलाज करत आहेत. रोज ते मुलांना तपासतात, त्यांचा उपचार सुरू करतात. मुलांना आराम होतो ते पाहून त्यांना आनंद होतो. मात्र ज्यावेळी ते त्यांचा जीव वाचवू शकत नाहीत त्यावेळी त्यांना दु:ख होते. ते म्हणतात की, कित्येकदा असेही होते की, “ खूप उशिराने पालक मुलांना घेवून येतात, कित्येकदा हा उशिरच जीवघेणा होवू शकतो. कारण स्थिती हाताबाहेर गेली असते ती सुधारू शकत नाही. तरीही आम्ही आमच्या परीने प्रयत्नशील असतो”. डॉ बगई हे सुध्दा सांगतात की, डॉक्टरच्या पेशात मेहनत करावीच लागते. इतर कोणत्याच पेशात इतकी आणि अशी मेहनत करावी लागत नाही, जितकी एका डॉक्टरला त्याच्या रूग्णांसाठी करावी लागते. लहान मुलांच्या आजारांचे विशेषज्ञ असणारे डॉ बगई त्यांच्याच शब्दात सांगतात “ डॉक्टर होणे सोपे नाही, प्रवेश घेताना मेहनत, नंतर साडेपाच वर्षही मेहनत करूनच पदवी मिऴते. त्यानंतर साडेतीन वर्ष विशेषज्ञ होण्यात जातात. त्यानंतर अनूभव घेण्यासाठी कुणा रूग्णालयात काम करावे लागते. त्यानंतर परिपक्व अनुभव घेताना तीस वर्ष लागतात, आणि त्यानंतर जेव्हा हा डॉक्टर लोकांची सेवा करू लागतो त्यावेळी त्याचा सारा वेळ या सेवेत जात असतो.”


image


मोठी गोष्ट ही आहे की ते स्वत: खूपच व्यस्त असतात, रात्री उशिरापर्यंत त्यांना रूग्णसेवेत रहावे लागते. ते खूप लोकप्रिय आणि प्रसिध्द असल्याने तर दूरून लोक त्यांचे नाव ऐकून येत असतात, अशावेळी त्यांना न्याय द्यावा यासाठी ते काम करत राहतात. या सा-यातून ते आपल्या कुटूंबासाठी कसा वेळ काढतात असे विचारल्यावर ते म्हणाले की, “ त्यासाठी जीवनात नियोजन आणि शिस्त फार महत्वाची असते. मी सारी कामे त्या नियोजनात करतो. मी दिवसांची सुरूवात लवकर करतो. दुपारच्या आधीच मी सारी कामे पूर्ण करतो जेणेकरून मला स्वत:ला वेळ मिळू शकेल. रूग्णालयात राऊंड घ्यावे लागते, ओपीडी पहावी लागते. माझ्यावर माझ्या वृध्द आई वडिलांची जबाबदारी सुध्दा आहे. कुटूंब आणि मुलांसाठीही वेळ काढावा लागतो. सर्वाना न्याय देता यावे म्हणुन मला वेळेचा योग्य उपयोग करावा लागतो. मला सारे काही समतोल करणे कठीण आहे मात्र अशक्य नाही. मी सा-यात आनंद घेत असतो.” आम्ही स्वत:च पाहिले आहे की डॉ बगई वेळ आणि शिस्त याबाबत तडजोड करत नाहीत. नव्हे ते शिस्तीसाठी खूप कठोर आहेत. वेळ वाया घालविणे आणि कामात कुचराई त्यांना अजिबात चालत नाही. जीवनात नियोजन आणि शिस्त असल्यानेच ते या सा-या कामात विश्वास आणि समर्थतेने रूग्णांना सेवा देत आहेत. त्यांच्यासारखेच लोकांनी वागावे म्हणून ते शिकवण देत असतात.

डॉ बगई यांनी जीवनात असामान्य यश मिळवले आहे, मोठ मोठे लोक वैज्ञानिकांचा त्यांच्यावर लोभ जडला आहे. लहान मुलांच्या रोगांच्या बाबतीत तर ते जगात प्रसिध्द आहेत. वेगवेगळ्या संस्था त्यांचे ज्ञान घेण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलवत असतात. त्यांचे संशोधन आणि लेख जगभरातील नियतकालिके आणि वृत्तपत्रात येत असतात. डॉ बगई हे मेहनत, शिस्त, प्रतिभा यांचे जिवंत उदाहरण आहेत. त्यामुळे ते अनेकांना प्रेरणा देत असतात. जीवनात यश मिळवण्या बाबत विचारणा केली असता ते म्हणतात की, “ सारे जण आपले नशीब स्वत:च लिहित असतात, असे खूप लोक आहेत जे माझ्या पेक्षा जास्त यशस्वी आहेत, त्यांचे जीवन माझ्या पेक्षा जास्त यशस्वी आहे. मी खूपच विनम्र परिवारातून आलो आहे. मी १९ ९० मध्ये दिल्लीत आलो त्यावेळी माझ्याजवळ केवळ सहा हजार रूपये होते. पण मेहनत करुन मी यश मिळवले. मला कुणी त्यावर विचारले तर मी सांगतो की निश्चय पक्का हवा, मेहनत ही केलीच पाहिजे, मनातून हारण्याची भिती काढून टाका, आव्हाने येत राहणारच, त्यांचा मुकाबला करायला शिका, मागे हटू नका. जीवन मोठे आहे, प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजेत”.

तसे तर डॉ संजीव बगई सा-या गोष्टीत निष्णात आहेत पण ते प्रत्येक गोष्ट गंभीरतेने घेतात ही सर्वात मोठी गोष्ट आहे. लहान मुलांचा इलाज असो की स्वत:चा छंद पूर्ण करणे असो सारी कामे ते तितक्याच गंभीरतेने करतात. आणखी एक गोष्ट आहे जी अनेकांना माहिती नाही त्यांना प्रथम पाहिले तर ते कुणालाही सैन्याधिकारी वाटतील, कारण त्यांच्या रूबाबदार मिश्या, आणि त्यांच्या आवाजात असलेला गंभीर डौल! वसंत विहार येथे त्यांच्या क्लिनीक मध्ये झालेल्या मुलाखती दरम्यान डॉ बगई यांनीआम्हाला ते रहस्य देखील सांगितले की ते कसे नवजात बाळांना असलेल्या त्रासाबद्दल जाणू शकतात. त्यांच्या मते याचे तीन टप्पे आहेत, ज्यातून त्यांना लहान मूक्या बाळाच्या वेदना समजतात. पहिले खूपच सुक्ष्मतेने ते बाळाचे निरिक्षण करतात, मुलाच्या पालकांकडून त्याच्या वागण्याबाबत, खाणे पिणे इत्यादीबाबत लहानसहान बाबी माहिती करून घेणे. त्यानंतर मुळातून बाळाला तपासणी करणे. जर या तीन गोष्टी सहजतेने झाल्या तर डॉक्टराना बाळाच्या त्रासाबाबत माहिती होते. डॉ बगई यांनी आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेक मोठ्या रूग्णालयांना सेवा दिली. ते इंद्रप्रस्थ अपोलो रूग्णालय आणि बात्रा रूग्णालयाशी देखील संलग्न आहेत. रॉकलँण्डशी त्यांचा जुने संबंध आहे, ते नेफ्रॉन क्लिनिक आणि हेल्थ केअरचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक सुध्दा आहेत. एक वैद्यकीय प्रशासक म्हणूनही त्यांचा लौकीक आहे. सध्या ते दिल्लीच्या मणिपाल सुपर स्पेशालिटी रूग्णालयाला देशातील नामांकित करण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहेत. डॉ बगई प्राध्यापक आहेत, एक अनूभवी आणि उदार शिक्षक ते वेगेवेगळ्या महाविद्यालयातून शिकविण्याचे कामही करतात.

    Share on
    close